Pages

बोधकथा








एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.





एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्‍याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्‍या शोधाची माहिती सांगू लागला की '' सूर्य प्रचंड उष्‍ण तारा असूनही त्‍यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्‍ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्‍वीवर आला तर पृथ्‍वीचे काय होईल हे पहा.'' खगोलशास्‍त्रज्ञाच्‍या या बोलण्‍यावर काही लोकांचा खरेच विश्‍वास बसला व त्‍यांच्‍यापैकी काही लोकांनी त्‍याचा सत्‍कार करण्‍याचे ठरविले. पण जमलेल्‍या काही लोकांपैकी एक जण चिकित्‍सक होता त्‍याने त्‍या ज्‍योतिष्‍याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्‍याने ती दुर्बिण तपासली असता त्‍याच्‍या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्‍या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्‍हणजे महाकाय प्राणी असल्‍याचा भास होत होता. चिकित्‍सक माणसाने ही गोष्‍ट लोकांना सांगताच त्‍यांना शास्‍त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.
तात्‍पर्य :- जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्‍यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.
कथा आवडली तर लाईक करा